लेख क्रमांक १. शब्द
'शब्द'. व्याकरणाच्यादृष्टीने अडीच अक्षरी असलेल्या या शब्दाला मानवी समाजजीवनात फार महत्त्वाचे स्थान आहे. 'शब्द' या अडीच अक्षरी शब्दात तसे पाहिले तर समग्र मानवी जीवन कवेत घेण्याचे सामर्थ्य आहे कारण या शब्दांशिवाय आपल्या जीवनाला, वर्तनाला काहीच अर्थ प्राप्त होत नाही. व्याकरणाच्यादृष्टीने अनेक अक्षरांचा समूह म्हणजे 'शब्द' अशी प्रातिनिधिक व्याख्या केली जात असली तरी या शब्दांचे महत्व ज्याला समजले तो जगज्जेता झाल्याशिवाय राहणार नाही. शब्दांचे साम्राज्यच इतके विस्तीर्ण आहे की,भल्याभल्यांना ते साम्राज्य आपल्या कवेत घेता आले नाही. एवढे मात्र खरे की, ज्याने ज्याने या शब्दांच्या साम्राज्याला कवेत घेण्याचा प्रयत्न केला त्याच्या व्यक्तिमत्वाला शब्दांनी मात्र निश्र्चितच आकार दिला आहे. त्याच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची एक वेगळी ओळख करून दिली ती शब्दांनीच ! एखाद्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी एखाद्याचे शब्द जसे कारणीभूत असतात. तसेच एखाद्याचे व्यक्तिमत्व बिघडण्यासही ...