लेख क्र. 2 मिलिंद महाविद्यालयाची अमॄतमहोत्सवी वाटचाल.
मिलिंद महाविद्यालयाची अमृत महोत्सवी वाटचाल
प्रा. डॉ. मिलिंद माणिकराव वाव्हळे
मराठी विभाग
मिलिंद कला महाविद्यालय,
नागसेनवन, औरंगाबाद
मो. 9421678635
“जगप्रसिद्ध अजिठ्यांची लेणी सांगते तथागताची गाथा,
‘मिलिंद’ च्या गौरवशाली परंपरेपुढे सदैव झुकतो माथा ।।’’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई ची स्थापना केली या संस्थेने मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालय व औरंगाबाद येथे 19 जून 1950 रोजी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. आज दि. 19 जून 2024 रोजी मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेला 74 वर्षे पूर्ण होऊन मिलिंद महाविद्यालय त्याच्या अमृत (75 व्या) महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. ही आपल्या सर्व आंबेडकरी अनुयायांसाठीच नव्हे तर मिलिंदच्या सृजनशील मातीतून संस्कारशील शिक्षणाची, ज्ञानाची शिदोरी घेऊन आपल्या प्रचंड गुणवत्तेच्या बळावर समाजजीवनात ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा अमीट असा ठसा निर्माण केला व ‘मिलिंद’च्या संस्काराची महती आपल्या कार्यकर्तृत्वातून दाखवून दिली अशा प्रत्येक ‘मिलिंदियन’ विद्यार्थ्यांसाठी हा क्षण अतिशय अभिमानाचा व आनंदाचा आहे. ‘मिलिंद महाविद्यालया’ च्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मागील 74 वर्षांच्या गतकालीन स्मृतीकडे वळून पाहत असताना आपल्या सारख्यांच्या मनात सहजपणे ‘मिलिंद महाविद्यालय विषयीचे भावतरंग मनात दाटून येतात व हळूवारपणे मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेची पार्श्वभूमी, मिलिंद महाविद्यालय स्थापनेच्या कार्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रत्यक्ष योगदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाच्या यथायोग्य संचालनासाठी निवडलेली प्रचंड विद्वान माणसे निवडली व या प्रचंड विद्वान माणसांनी नागसेनवनातील सृजनशील मातीला आपल्या संस्कारशील अनुभवांनी आकार दिला. याच मातीतून अनेक समाजरत्न निर्माण झाले. ‘मिलिंद महाविद्यालयाने’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक तत्त्वज्ञानाचा वारसा आज सिद्ध केला आहे.
‘मिलिंद महाविद्यालयाने आज समाजजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या विद्यार्थ्यांच्या कार्य कर्तृत्वाचा अमीट असा ठसा उमटविला आहे ही निश्चितच अभिनंदनीय व अभिमानाची गोष्ट आहे. साहित्य-समाज-संस्कृती, क्रीडा-वैद्यकीय, आर्थिक, राजकीय आदि. क्षेत्रांत आज मिलिंदचा विद्यार्थी यशस्वी झालेला आहे व पुढे ही होत राहिल. ‘मिलिंद’ च्या या संस्कारशील, सदाचरण संपन्न अशा सृजनशील मातीने अनेकांच्या आयुष्याला आकार दिला व या पुढे ही देत राहिल यात शंका नाही.
मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेला 74 वर्ष पूर्ण करून 75 व्या अमृत महोत्सवी वर्षात दि. 19 जून 2024 रोजी पदार्पण करत आहे. ही सर्व आंबेडकरी जनतेसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मिलिंद महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वाटचालीकडे वळून पाहताना या महाविद्यालयाच्या स्थापनेचा उद्देश आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे. या विषयी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य म.भि. चिटणीस म्हणतात, “स्वत:च्या अगदी पहिल्याच महाविद्यालयाच्या यशामुळे स्वत:च्या कार्यक्षमतेचा विस्तार करावा असा आत्मविश्वास डॉ. आंबेडकर यांना वाटू लागला. निजामाच्या गुलामगिरीतून 1946 साली मुक्त झालेल्या मराठवाड्याकडे त्यांचे डोळे वळले. पंचावन्न लाख लोकवस्तीसाठी उस्मानिया विद्यापीठाचे द्वितीय वर्षांपर्यंतच असणारे केवळ दीडशे विद्यार्थ्यांचे एकमेव महाविद्यालय यातही अनुसूचित जातींमधील फक्त दोनच विद्यार्थी होते. मराठवाड्याच्या मुक्तीनंतर एकाच वर्षात डॉ. आंबेडकर यांनी त्या प्रदेशाला भेट दिली. भारतातील इतर कोणत्याही प्रदेशापेक्षा परक्या सरंजामशाहीच्या हुकुमाखाली भरडेल्या गेलेल्या स्वत:च्या लोकांची भयानक स्थिती त्यांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिली. प्रगतीच्या आणि आधुनिकतेच्या वाट्यालाही उभे राहू दिले नसलेल्या, वडिलोपार्जित परंपरेने गावाचे नोकर समजून त्यांना त्यांच्या त्यांच्या खेड्यातून यांना कायमचे जखडून ठेवलेल्या त्या परिसरातील अनुसूचित जातींच्या लोकांना बलुतेदारी सोडून देण्याचे आवाहन त्यांच्या एका प्रचंड सभेत, औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी केले. त्यांनी त्या लोकांना आग्रहाने विनवून सांगितलेली जितके म्हणून शक्य होईल तितके शहरी भागात जाऊन एकत्रित व्हा आणि स्वत:च्या मुलांना पदवी पर्यंतचे आणि त्याही पुढील शिक्षण देऊ कोणतीही किंमत देऊन द्या. त्यांच्या प्रगतीत वाढ करण्यासाठी औरंगाबाद येथे महाविद्यालय स्थापन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्या लोकांच्या संवदेनक्षम मनामध्ये त्यांनी जे बीज त्या दिवशी पेरले त्यांची मुळे नंतरच्या दशकात धरू लागली.” मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेमागची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नेमकी भूमिका प्राचार्य म.भि.चिटणीस यांनी येथे विशद केली आहे.
‘मिलिंद’ महाविद्यालयाची वास्तू :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केल्यानंतर त्यांना या महाविद्यालयासाठी एक प्रचंड वास्तू निर्माण करावी लागली. या वास्तू विषयी प्रा.ल.ब. रायमाने म्हणतात, “1950 साली औरंगाबाद येथे कॉलेज काढले. मोठी जागा घेतली. राष्ट्रपती राजेंद्रबाबूच्या हस्ते बिल्डिंगची कोनशिला बसवली. औरंगाबादचे भूषण ठरेल असा भव्य प्रासाद यांनी उभारला. बाबासाहेबांची सर्वांगीण अशी दूरदृष्टी दिसून येते. पश्चिम मुखी अशी ही लांबलचक बिल्डिंग आहे. दोन्ही बाजुला दोन्ही हात पुढे आलेले आहेत अशी रचना आहे. दोन्ही बाजुला बौद्ध स्तुपांचे गोलाकार आहेत. समोरच्या बाजूला सुंदर बाग आहे. तेथे बोधिवृक्ष लावलेले आहेत. वस्तुला लांबलचक असा व्हरांडा आहे. खुल्या हृदयासारख्या तो दिसतो. तेथे बिल्डिंगच्या मध्यभागी टॉवरची कल्पना होती. तेथे पहिल्या मजल्यावर भगवान बुद्धांची मूर्ती आहे. दक्षिणेच्या बाजूला आर्टस कॉलेजचे प्राचार्य आणि उत्तरेच्या बाजूला सायन्य कॉलेजचे प्राचार्य आणि उत्तरेच्या बाजुला सायन्स कॉलेजचे प्राचार्य यांची कार्यालये आहेत. बिल्डिंगमध्ये पूर्वेकडच्या बाजूने प्रवेश आहे. इतिहासातील भव्य राजवाड्यात जशा असतात तशा पायऱ्या आहेत. पहिल्या मजल्यावर सर्व स्वतंत्र दालनात बाबासाहेब राहत असत. वेरूळची लेणी, खुलताबाद असा इतिहास आहे. कला संस्कृतीचे भान देणारा प्रदेश आहे. या वास्तूच्या मध्यभागातील पहिल्या मजल्याच्या गॅलरीतून पूर्वेकडे पाहिले तर समोरचा भव्य आसंमत दिसतो. जणू काय आपण आपले भविष्य आपल्या कवेत घ्यावे अशी भावना इथे मनात तरळून जाते. एकूण काय इतिहास, संस्कृती आणि कलेच्या या परिसरात डॉ. बाबासाहेबांनी आपल्या कर्तृत्वाने, परिश्रमाने आणि दूरदृष्टीने आपल्या स्वप्नांची शिल्पे उभारली आहेत. डॉ. बाबासाहेबांना या वास्तूच्या समोरच्या पश्चिमेकडील भागात अनेक पुतळे उभारायचे होते. मानवी संस्कृतीचे दर्शन त्यांना घडवायचे होते. इमारतीच्या दोनही बाजूस कार्ल मार्क्स आणि डार्विन यांचे पुतळे आणि मध्यभागी मानवी संस्कृतीतील थोर क्रांतिकारी भगवान बुद्ध यांचा पुतळा उभारायचा होता. यासाठी मा. वराळे साहेबांच्या मध्यस्थानी श्री. मडिलगकेर यांची योजना केलेली होती.’’ प्रा.ल.बा. रायमाने यांनी मिलिंदच्या या ऐतिहासिक वास्तूचे, प्रासादाचे केलेले विवेचन अतिशय समर्पक आहे.
‘मिलिंद’ची सृजनशील, संस्कार संपन्न परंपरा :
‘मिलिंद’च्या सृजनशील मातीला नवनिर्मितीची मोठी संस्कार संपन्न वैचारिक, शैक्षणिक परंपरा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत: प्रत्यक्ष बारकाईने लक्ष ठेवून मिलिंद महाविद्यालयाच्या प्रारंभीच्या काळातील विद्वान प्राचार्य, गुणवत्तापूर्ण प्राध्यापकांची निवड केली होती. या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होण्याचा मान म.भि. चिटणीस यांना मिळाला होता. प्राचार्य म. भि. चिटणीस यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा डॉ. म. ना. वानखडे, डॉ. एम. एल. सहारे, डॉ. एस. एम. पिंगे, प्रा. एस. आर. हणमंते, डॉ. जी. एस. लोखंडे, प्रा. टी. एस. सक्सेना, प्रा. एस. एन. रामटेके, प्रा. एल. बी. रायमाने, प्रा. एस. टी. प्रधान, प्रा. एच. एस. गंभिरे, डॉ. आय. डी. आल्टे, प्रा. ए. एच. शामकुळे, डॉ. एल. बी. वाघमारे अशा प्रकारे पुढे सुरू राहिलेली आहे. दि. 01/04/2008 रोजी ‘मिलिंद’ महाविद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच गुणवत्तेच्या आधारे पहिली महिला प्राचार्य होण्याचा मान प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान यांना मिळाला आहे. डॉ. वैशाली प्रधान यांनी प्राचार्य पदाची धुरा सांभाळल्यापासून सक्षमपणे मिलिंद महाविद्यालयाच्या गौरवशाली परंपरेला पुढे घेऊन जात आहेत. ही मिलिंद महाविद्यालयाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण बाब आहे.
‘मिलिंद’ च्या मातीतून अनेक रत्नांना घडविण्याचे कार्य ‘मिलिंद’च्या प्राचार्य व प्राध्यापकांनी देखील केले. मिलिंद महाविद्यालयात प्रा. रा. ग. जाधव, डॉ. भालचंद्र फडके, शांतिभद्र थेरा, प्राचार्य गजमल माळी, प्रा. म. फ. जिलठे, प्रा. मे. पुं. रगे, डॉ. र. शं. गुप्ते, प्रा. ल. बा. रायमाने, डॉ. प्रा. अविनाश डोळस, प्रा. एस. सुब्बामनी, प्रा. जी. एस. लोखंडे, प्रा. गंगाधर पानतावणे, प्रा. व्ही. के. जोशी, प्रा. सुमन प्रधान अशी एक फार मोठी नागसेनरूपी प्राध्यापकांची परंपरा मिलिंद महाविद्यालयात अनेक विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार घडवित होती. या नागसेनरूपी प्राध्यापकांच्या योग्य अशा मार्गदर्शनामुळेच आज समाजजीवनात मिलिंदचे विद्यार्थी फार मोठ्या पदांवर विराजमान झालेले दिसतात. ही महाविद्यालयाच्या गौरवशाली इतिहासात प्रकर्षाने नोंद घ्यावी, अशी उल्लेखनीय बाब आहे.
‘मिलिंद’ महाविद्यालयाचे वैभव :
मिलिंदच्या सृजनशील मातीने अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार दिला आहे. या मातीच्या मूशीतूनच आज समाजजीवनाची विविध क्षेत्रे ज्यांनी आपल्या कार्यकृर्तत्वाने झळाळून काढली अशी अनेक नावे आपल्याला सांगता येतील. जागतिक दलित साहित्याचा आरंभबिंदू म्हणूनच आपल्याला मिलिंदच्या साहित्यिक परंपरेकडे पाहता येते. जागतिक पातळीवर दलित साहित्याची निर्मिती पहिल्यांदा मिलिंद महाविद्यालयातच सुरू झाली. या दलित साहित्यिकांच्या परंपरेत, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. सुखदेव थोरात, प्रा. वामन निंबाळकर, प्रा. प्र. ई. सोनकांबळे, डॉ. महेंद्र भवरे, राम दुतोडे, प्रा. सुखराम हिवराळे, अरूणा लोखंडे, भालचंद्र वराळे, कृष्णा इंगळे, विजयकुमार गवई, प्रमोद वाळके, एम. एफ. गांजरे, भगवान भटकर, उध्दव कांबळे, अविनाश डोळस अशी फार मोठी साहित्यिकांची प्रदीर्घ परंपरा ‘मिलिंद’ने दलित साहित्याला दिली आहे. इतकेच नाही तर मराठी साहित्यातील अनेक नामवंत साहित्यिक मिलिंदच्या मातीतून लिहिते झाले आहेत. त्यात डॉ. सुधीर रसाळ (माजी मराठी विभागप्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद,), न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, डॉ. प्रभाकर मांडे (लोकसाहित्यिक अभ्यासक व माजी मराठी विभागप्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, पद्मश्री पुरस्कार प्राप्त) ही काही प्रमुख नावे सांगता येतील. या साहित्यिकांनी समाजजीवनाच्या विविध भावकंगोऱ्यांना आपल्या लेखणीच्या साहाय्याने चित्रित केला आहे. या साहित्यिकांच्या लेखणीने अवघे समाजजीवन बदलण्यास फार मदत झाली आहे. मिलिंद महाविद्यालयाच्या कर्तृत्त्वाविषयी डॉ. यशवंत मनोहर म्हणतात, “ मिलिंद महाविद्यालय ही केवळ शैक्षणिक संस्था नव्हती ती आंबेडकरी आंदोलनाची अविभाज्य अशी बौद्धिक छावणी होती. केवळ स्वत: पुरतेच जगणाऱ्या बिन चेहऱ्यांच्या सुशिक्षितांची गर्दी समाजाच्या सुपूर्द करणे हे ध्येय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयातून शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांच्या रूपाने आमुलाग्र समाजक्रांतीचा कार्यक्रम समाजात जावा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘अत्त दीप भव’ होऊन बाहेर पडावे, स्वत: प्रज्ञेचा आणि करूणेचा इमानदार प्रकाश व्हावे, समाजाच्या ज्या भौगोलिक वास्तवात ते जातील ते वास्तव त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वातील न्यायाने उजळून टाकावे असे बॅनर मिलिंदच्या मस्तकावर होते.” डॉ. यशवंत मनोहर यांनी मिलिंद महाविद्यालयाच्या एकूणच ध्येयाविषयी व कार्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचप्रमाणे मिलिंद महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी समाजाची शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक क्षेत्रे, राजकीय आपल्या दैदिप्यमान कार्य कर्तृत्त्वाने प्रकाशमान केली आहेत हे मात्र नक्की!
आजचे मिलिंद महाविद्यालय :
कोणत्याही शिक्षण संस्थेच्या प्रदीर्घ इतिहासात अनेक चढ, उतार येत असतात. मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागात शिक्षणासाठी जेव्हा एखाद-दुसरं महाविद्यालय होतं. त्याकाळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्याच्या मातीत मिलिंद महाविद्यालय स्थापन केलं. या महाविद्यालयाच्या इतिहासात ही मागील 74 वर्षात असंख्य विद्यार्थी आले गेले. त्या असंख्य विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने येथे शिक्षण घेतले व आजही विविध मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहेत.
मिलिंद महाविद्यालयाच्या या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करताना आनंदाची बाब ही आहे की, डॉ. वैशाली प्रधान यांनी प्राचार्य पदाची धुरा सक्षमपणे सांभाळून आज 16 वर्षे झाली आहेत. पहिली महिला प्राचार्य म्हणून या काळात त्यांनी केलेले कार्य निश्चितच फार महत्त्वाचे आहे. त्यात मिलिंद महाविद्यालयाचे ‘नॅक’ मूल्यांकन साधारणपणे 2002-2003 मध्ये झाले होते. त्यानंतर बरीच वर्षे विविध कारणांमुळे ही नॅक मूल्यांकन प्रक्रिया रखडली होती. ती जवळपास 20 वर्षांनी 2022-2023 मध्ये प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांच्या अविश्रांत, अथक परिश्रमामुळे पूर्ण झाली व महाविद्यालयाला ‘नॅक’ पुनर्मूल्यांकनात ‘बी प्लस’ दर्जा मिळाला. ही निश्चितच आनंददायी बाब आहे. यानिमित्ताने महाविद्यालयात इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, राज्यशास्त्र या विषयाची पीएच.डी. संशोधन केंद्रे ही स्थापन करण्यात आली. ही महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीतील फार महत्त्वाची गोष्ट आहे. मिलिंद महाविद्यालयात सतत विद्यार्थ्यांच्या ज्ञानाजर्नाची भूक भागविण्यासाठी विविध व्याख्यानांचे आयोजन केले जाते. प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान यांच्या कार्यकाळातच पीईएस संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात 2019-2020 मध्ये ‘मिलिंद मॅरेथॉन’ सारखा मोठा उपक्रम राबविला. तसेच यावेळी सर्वच विषयाची राष्ट्रीय चर्चासत्रांचे आयोजनही केले होते. तसेच या अमृत महोत्सवी वर्षातही आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन ही होणार आहे.
आजच्या मिलिंद महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीकडे पाहत असताना आजही महत्त्वाच्या पदांवर मिलिंद महाविद्यालयाचा विद्यार्थी आपल्या कार्यकर्तृत्त्वाचा अमीट ठसा उमटवितांना दिसतो. मिलिंद कला महाविद्यालयाने आपल्या आगामी काळात अशीच प्रगती करीत रहावी हीच या निमित्ताने मंगलकामना व ‘मिलिंद’ महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
- डॉ. मिलिंद वाव्हळे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा