लेख क्रमांक १. शब्द
'शब्द'. व्याकरणाच्यादृष्टीने अडीच अक्षरी असलेल्या या शब्दाला मानवी समाजजीवनात फार महत्त्वाचे स्थान आहे. 'शब्द' या अडीच अक्षरी शब्दात तसे पाहिले तर समग्र मानवी जीवन कवेत घेण्याचे सामर्थ्य आहे कारण या शब्दांशिवाय आपल्या जीवनाला, वर्तनाला काहीच अर्थ प्राप्त होत नाही. व्याकरणाच्यादृष्टीने अनेक अक्षरांचा समूह म्हणजे 'शब्द' अशी प्रातिनिधिक व्याख्या केली जात असली तरी या शब्दांचे महत्व ज्याला समजले तो जगज्जेता झाल्याशिवाय राहणार नाही. शब्दांचे साम्राज्यच इतके विस्तीर्ण आहे की,भल्याभल्यांना ते साम्राज्य आपल्या कवेत घेता आले नाही. एवढे मात्र खरे की, ज्याने ज्याने या शब्दांच्या साम्राज्याला कवेत घेण्याचा प्रयत्न केला त्याच्या व्यक्तिमत्वाला शब्दांनी मात्र निश्र्चितच आकार दिला आहे. त्याच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची एक वेगळी ओळख करून दिली ती शब्दांनीच ! एखाद्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी एखाद्याचे शब्द जसे कारणीभूत असतात. तसेच एखाद्याचे व्यक्तिमत्व बिघडण्यासही एखाद्याचे शब्दच कारणीभूत असतात. शब्द तेच असतात परंतु या शब्दांचा समर्पक वापर जो करतो तोच आपल्या स्वतःसह इतरांच्या व्यक्तिमत्वालाही आकार देऊ शकतो म्हणूनच कदाचित शब्द हे दुधारी तलवारीसारखे असतात असं म्हटलं जातं. शब्दांची नजाकत ओळखून जो शब्दांना आपलेपणाने जवळ करतो त्याच्यासाठी तर शब्द आईच्या पान्ह्याप्रमाणे ओसंडून वाहत जवळ येतात म्हणूनच त्या व्यक्तीच्या हातून एखादी अजरामर कलाकृती निर्माण होऊ शकते व त्यामुळेच त्या व्यक्तीचे नाव व कर्तॄत्व इतिहासाच्या पटलावर अजरामर होऊन जाते. शब्द हेच माणसाला आयुष्यात उभे राहण्याचे सामर्थ्य देतात. आपण अनेक वेळा वक्तृत्व स्पर्धेतील वक्त्यांची भाषणे ऐकतो. या भाषणातील प्रत्येक शब्द इतका प्रभावी असतो की, तो एखाद्याचा जीवनमार्ग निश्चितच बदलू शकतो. वक्तृत्व म्हणजे नेमकं काय? असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या भाषणात विषयाच्या अनुषंगाने समर्पक शब्दांची मांडणी करून आपला विषय प्रभावीपणे पटवून सांगणं असं आपल्याला म्हणता येते. अर्थातच ही एक कला असली तरी या कलेत शब्दच त्याच्या मदतीला प्रभावीपणे धावून जातात व त्यात तो यशस्वी होतो. त्यासोबतच या कलेतून त्याला चांगले अर्थार्जनही होतेच. म्हणजेच शब्दांचा समर्पक वापर जो करतो तो आयुष्यात चांगली प्रतिष्ठा तर कमावतोच सोबत अर्थार्जनही करतोच. शब्दांचा हा प्रवास मानवी जीवनाबरोबरच त्याच्या उत्क्रांतीच्या अवस्थेनुसार बदलत गेला आहे. या शब्दांच्या अवस्थेतच मानवी समाजजीवनातील अवस्थांप्रमाणेच निरनिराळे बदल झालेले आहेत. या शब्दांच्या सहाय्यानेेच अनेक इतिहास, महाकाव्ये लिहिली गेली. त्यासोबतच या शब्दांचा योग्य वापर करून अचूक इतिहास लिहिला गेला तर कधीकधी या शब्दांना आपल्या मनाप्रमाणे रेखाटून इतिहासाच्या पानांचे विकृतीकरण केलं
गेलं. असं असलं तरी एकूणच मानवी जीवनाला
योग्य दिशा देण्याचे कार्य या शब्दांनीच केले हे मात्र नक्की ! शब्दांच्या या प्रदीर्घ अशा प्रवासात अगदी प्राचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासापासून ते आजच्या वर्तमानातील अनेकांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून या शब्दांच्या विविधांगी भूमिकेविषयी, शब्दांच्या विशेषणांविषयी, शब्दांच्या एकूणच भावविश्वाविषयी आपापल्यापरीने शब्दांची महती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शब्दांची महती मांडतांना या कवींनी, साहित्यिकांनी अतिशय हळुवारपणे 'शब्द' या अडीच अक्षरांचे विविधांगी पदर उलगडले आहेत. कधी हे शब्द एखाद्याला दुधारी तलवारी सारखे वाटतात तर कधी हेच शब्द एखाद्याला आईच्या पान्ह्यासारखे वाटतात. मानवी जीवनात एखादा व्यक्ती भलेही आर्थिकदृष्ट्या कफल्लक असेल परंतु तो व्यक्ती मात्र शब्दांच्यादॄॄष्टीने शब्दप्रभू, असंख्य शब्दांचा धनी असतो हे मात्र खरे. संत तुकाराम महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां सारखी अनेक व्यक्तिमत्वे ही आर्थिकदृष्ट्या संपन्न नसली तरी शब्दांच्या साम्राज्याचे ते अनभिषिक्त सम्राट होते हे त्यांच्या लेखनावरून आपल्या लक्षात येईल. संत तुकाराम महाराज म्हणतात, " आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू", म्हणजेच तुकाराम महाराजांनी या अभंगात शब्दांविषयी व्यक्त केलेला भाव पाहिला तर शब्दांची एकूणच महती सहजपणे वाचकांच्या नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. तत्कालीन समाजजीवनातील सर्वसामान्य समाजातील लोकांजवळ असलेले शब्द संत तुकाराम महाराजांना रत्नांसारखी तर कधी शस्त्रासारखी वाटू लागतात . शब्दांच्या सामर्थ्याला संत तुकाराम महाराजांनी अचूकपणे हेरले होते म्हणूनच आज इतक्या वर्षांनंतरही त्यांची अभंग रचना आपल्या मनाच्या पटलावर रुंजी घालताना दिसते. 'शब्द' हे कधी कधी कडाडणार्या विजेसारखे असतात तर कधी कधी आईच्या प्रेमळ कुशीसारखे असतात. जो व्यक्ती या शब्दांच्या प्रेमात पडतो त्याला शब्द कधीच दुजाभावाने वागवत नाहीत तर उलट त्याच्या मनाच्या अंतरंगात नवनवीन विचारांची वारुळे सहजपणे निर्माण करतात व तो व्यक्ती अगदी हळुवारपणे आपल्या मनातील विचारांना या शब्दांच्या साह्याने प्रसवू लागतो. तो चांगला कवी, नाटककार, कादंबरीकार, चरित्रकार इत्यादी साहित्यप्रकारात नावाजलेला लेखक होतो व आपल्या शब्दांच्या प्रभावीपणामुळेच आपले नाव इतिहासाच्या पटलावर अजरामर करून जातो. याची असंख्य उदाहरणे आपल्याला सांगता येतात. मराठी साहित्याच्या संदर्भाने विचार करता अनेक कवींनी, लेखकांनी आपापल्यापरीने शब्दांच्या विविधांगी स्वरूपाला व्यक्त केले आहे. कधीकधी त्या कवींच्या व्यवहाराची भाषा, त्यांचे शब्दच त्यांच्या लेखनाचे प्रभावी माध्यम झाले आहे. याच परंपरेत पुढे दलित कवींनी आपल्या जीवनातील अनुभवांना शब्दांत व्यक्त करून मानवी जीवनानुभव व्यक्त केला आहे. 'शब्दां'विषयीची भावना व्यक्त करताना वामन निंबाळकर म्हणतात, "शब्दांनीच पेटतात घरे,दारे, देश आणि माणसे सुद्धा. शब्द विझवतात आगही शब्दांनी पेटलेल्या माणसांची. शब्द नसते तर पडल्या नसत्या डोळ्यांतून आगीच्या ठिणग्या
वाहिले नसते आसवांचे महापूर आले नसते जवळ कुणी केले नसते दूर शब्दच नसते तर......." वामन निंबाळकर यांनी अतिशय सहज, साध्या, सोप्या पद्धतीने शब्दांची महतीच
आपल्या कवितेतून व्यक्त केली आहे. एखाद्याचे शब्द इतके स्फोटक असतात की, त्यातून माणसे सुद्धा पेटू शकतात; तर दुसर्या बाजूला एखाद्याचे शब्द इतके ओजस्वी, करूणेने ओतप्रोत भरलेले असतात की, या शब्दांमध्ये पेटलेली आगही
विझवण्याचे सामर्थ्य असते. या ओजस्वी शब्दांमुळेच असंख्य नवीन नाती निर्माण होतात तर या शब्दांच्या तीक्ष्ण माऱ्यामुळे रक्ताची असलेली नाती सुद्धा आपल्यापासून कायमची दूर जातात हे समाजजीवनातील वास्तव आहे. एखाद्याचे शब्द इतके ओजस्वी असतात की तासनतास ते आपल्याला ऐकावे वाटतात तर एखाद्याचे शब्द इतके कंटाळवाणे असतात की कधी त्या व्यक्तीपासून आपल्याला सुटका मिळेल?अशी आपली अवस्था होते. शब्दांचे हे सामर्थ्य ज्याने ओळखले तो व्यक्ती नक्कीच आपल्या जीवनात यशाच्या एका मोठ्या टप्प्यावर विराजमान झालेला असतोच हे मात्र नक्की !
शेवटी एवढेच म्हणावे वाटते की, 'शब्द' म्हणजे बुद्धाची करुणा 'शब्द' म्हणजे आईचा पान्हा 'शब्द' म्हणजे महात्मा फुले यांचा आसूड 'शब्द' म्हणजे संत कबीराची समता 'शब्द' म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रज्ञा 'शब्द' म्हणजे नवनिर्मितीचे तत्वज्ञान 'शब्द 'म्हणजे मानवी जीवनाचे, प्रगतीचे अजरामर पान................................. ....... (समाप्त)--- डॉ. मिलिंद माणिकराव वाव्हळे, मराठी विभाग, मिलिंद कला महाविद्यालय, नागसेनवन,औरंगाबाद. मोबाईल नंबर : 94 21 67 86 35
उत्कृष्ट लिखाण सर धन्यवाद प्रा डीपी सोन टक्के
उत्तर द्याहटवालेखनला सुरुवात करणं हे माझ्यासाठी खुप महत्त्वाचे होते .बाकी लेखन उत्तम व शब्द या एका शब्दावर एवढे सुंदर लेखन करता येते.हे या लेखनावरुन लक्षात येते.तुम्ही एक चांगला लेखक,कवी,समीक्षक व्हावे ही मनोमन इच्छा.जे लेखन मला तुमच्याकडुन अपेक्षित होतं त्याला तुम्ही सुरुवात केली.त्त्यासाठी तुमचे आभार. त्यामुळे खुप आनंद होत आहे. अगदी छान असेच नवचैतन्यपुणॆ लेखन करत रहा.सामाजिक, राजकीय ,अंगानी लिहिण्याचा प्रयत्न करा.तुमच्या लेखनीला अशीच धार येवो .तुम्ही खुप चांगले लेखन करु शकतात.फक्त सुरुवात करण्याची मी वाट पाहत होते.माझी आशा आता पल्लवीत झाली आहे. खुप खुप शुभेच्छा.
उत्तर द्याहटवासर तुमच्या शब्दांना मला काय शाब्दिक उत्तर द्यावे हेच सुचत नाही
उत्तर द्याहटवाकॄपया आपल्या नावासह अभिप्राय नोंदवावा...
उत्तर द्याहटवाशब्दाविषयी खूप छान मांडणी केली आहे.
उत्तर द्याहटवासर तुम्ही "शब्द "या शब्दावर एवढे विस्तृत व सखोल लिखाण केले आहे की, त्याची प्रसंशा करण्यासाठी माझ्याकडे "शब्द "च राहिले नाही.
उत्तर द्याहटवायुवराज अभिमन्यू आठवले
सुंदर विषय; समर्पक लिखाण! शुभेच्छा!
उत्तर द्याहटवाखुप छान मांडणी केली सर धन्यवाद
उत्तर द्याहटवाKhup chan abhinandan
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवाखुप छान सर
उत्तर द्याहटवाI have been read your article Since today's morning. Your article is very beautiful and words structure is very good, I have know that you are genius and scholar of that topics, I think so you have most important your experience and hard worke on your life. I hope you will write new topic. Congrats sir for this topic.
उत्तर द्याहटवाDhamanand Gawade
सर्व मित्रांचे धन्यवाद...
उत्तर द्याहटवाशब्दांची महती सांगणारा उत्कृष्ट लेख आहे. या लेखाचे लेखक डॉ. मिलिंद वाहुळे यांना शब्द हे बुध्दाच्या करुणेसारखे, महात्मा फुले यांच्या आसुडासारखे, कबीराच्या समतेप्रमाणे वाटतात, शब्द म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रज्ञेची संकल्पना अशी शब्दांची व्याख्या ते करतात. यातुन त्यांचा शब्दांकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजतो. बुद्ध, कबीर, फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीने ते शब्दाकडे पाहतात. No alphabet in sight अशी अवस्था एकेकाळी होती. परंतु, बुद्ध, कबीर, फुले, आंबेडकर यांनी ही अवस्था बदलली, परिवर्तन घडवून आणले. शब्दांची ओळख ही या महापुरुषांमुळेच झाली. त्यामुळे लेखक डॉ. मिलिंद वाहुळे यांचा शब्दांकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला आवडला.
उत्तर द्याहटवासर्वांचे धन्यवाद..
उत्तर द्याहटवा