लेख क्र.3 ‘मिलिंद’च्या साहित्यिक परंपरेतील संवेदनशील ह्दयाचा सह्दयी लेखक : प्र. ई. सोनकांबळे

‘मिलिंद’च्या साहित्यिक परंपरेतील संवेदनशील ह्दयाचा सह्दयी लेखक : प्र. ई. सोनकांबळे

प्रा. डॉ. मिलिंद माणिकराव वाव्हळे 
मराठी विभाग, 
मिलिंद कला महाविद्यालय, 
नागसेनवन, औरंगाबाद
मो. 9421678635

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 19 जून 1950 रोजी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. ही घटनाच तत्कालीन अंध:कारमय मराठवाड्याची स्थिती पाहता क्रांतिकारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून, त्यांच्या कार्यातूनच प्रत्यक्षपणे औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना झाली. त्यामुळेच तर अक्षर ज्ञान नसलेल्या हजारो दलितांच्या जीवनात क्रांतिकारी बदलाचे वारे वाहू लागले आणि त्यांच्या आयुष्यात ज्ञानाच्या निळ्या पहाटेचे तांबंड फुटू लागले. हजारो वर्ष अज्ञानाच्या अंध:काराच्या गर्तेत जीवन जगणाऱ्या दलित समाजात ज्ञानाची स्थित्यंतरे झाली आणि याच स्थित्यंतराचा परिणाम म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ‘मिलिंद’च्या सृजनशील, संस्कारशील, मातीत                  डॉ. बाबासाहेबांच्या वैचारिक प्रेरणेतून बीजारोपण होताच मातीला ज्ञानाचे धुमारे फुटू लागले आणि मातीचे उदर फाडून बाहेर यावं तसंच ‘मिलिंद’च्या सृजनशील मातीतून अनेक साहित्यिक, लेखक, कवी जन्माला येवू लागले. ‘मिलिंद’च्या सृजनशील जमिनीला आपल्या ज्ञानाच्या, विद्वत्तेच्या बळावरच येथील नागसेनासारख्या विद्वान प्राध्यापकांनी कसले व मिलिंदच्या साहित्यिक परंपरेतील अनेक साहित्यिकरुपी ‘मिलिंद’ घडविण्याचे कार्य केले. याच काळात डॉ. यशवंत मनोहर, योगीराज वाघमारे, सुखराम हिवराळे, महेंद्र भवरे, राम दोतोंडे, आदि लिहिणाऱ्या सृजनशील लेखकांची फळीच दमदारपणे निर्माण झाली. याच परंपरेतील एक संवेदनशील, मातृह्दयी लेखक म्हणजेच     प्र. ई. सोनकांबळे. 

मिलिंदच्या संस्कारशील भूमीत : 
प्र. ई. सोनकांबळे यांचे महाविद्यालयीन शिक्षण मिलिंद महाविद्यालयात पूर्ण झाले. मिलिंद महाविद्यालयातील  प्राचार्य म. भि. चिटणीस, डॉ. म. ना. वानखडे,          प्रा. एस. टी. प्रधान, प्रा. मनोहर जिलटे, प्रा. ल. बा. रायमाने, प्रा. रा. ग. जाधव आदि प्राध्यापकांनी प्र. ई. सोनकांबळे सरांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला. उस्मानाबाद सारख्या दुर्गम भागातून कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असतांनाही औरंगाबाद येथे शिक्षणासाठी येणे व मिलिंद महाविद्यालयात प्रवेश घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक प्रेरणेतून झपाटून जाऊन साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणे ही एका सामान्य विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाची बाब होती. 1960 ते 80 या काळात मिलिंद महाविद्यालय एक महत्वाचे केंद्र बनले होते. प्राचार्य म. भि. चिटणीस यांनी सुरु केलेले विविध उपक्रम डॉ. म. ना. वानखडे सरांनी पूर्णत्वाला सैध्दांतिक रुप देऊन पूर्णत्वास नेले. प्राचार्य डॉ. म. ना. वानखडे यांच्यानंतर पुन्हा प्राचार्य म. भि. चिटणीस यांनी ‘मिलिंद’ चे शैक्षणिक व सांस्कृतिक नेतृत्त्व केले. डॉ. म. ना. वानखडे यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा आणि चळवळीचा वेध घेऊन समाजात सुरु असलेल्या मूल्य संघर्षाला अभिव्यक्ती मिळवून देण्यासाठी वैचारिक व वाङ्मयीन उपक्रमांना योग्य दिशा दाखविली. त्यासाठी मिलिंद जर्नल, मिलिंद मॅगेझिन, मिलिंद साहित्य परिषद, ‘अस्मिता’ त्रैमासिक’ यासारखे उपक्रम सुरु केले. त्यामुळेच तर या कालखंडातील अनेक विद्यार्थ्यांनी काळाच्या पटलावर आ पल्या कार्यकर्तृत्त्वाची अमीट अशी छाप उमटविली आहे. त्याचाच परिणाम प्र. ई. सोनकांबळे यांच्या व्यक्तिमत्त्वावर झाला होता.
प्र. ई. सोनकांबळे यांच्या ‘आठवणींचे पक्षी’ ची सुरुवात ‘मिलिंद’च्या हस्तलिखितात झाली. या हस्तलिखिताच्या परंपरेत अनेक साहित्यिकांनी आपल्या अनुभवांना वाट मोकळी करून दिली आहे. त्यामुळेच तर आज दलित साहित्यिकांची एक सशक्त, सृजनशील, संवेदनशील लेखकांची पिढीच या मिलिंद महाविद्यालयाने निर्माण केली याविषयी प्रा. मनोहर जिलटे म्हणतात, “महाविद्यालयात असतांना रायमाने सरांनी साहित्याच्या क्षेत्रात काही प्रयोग सुरु केले. त्यातील एक होता मिलिंद हस्तलिखित व पाक्षिक. या भीत्तिपत्रकाची सुरुवात. मिलिंदचा विद्यार्थी अनुभवाने समृध्द होता. महाविद्यालयात त्यांनी शब्द भाषा मिळाली होती. हा अनुभव त्यांना शब्दबध्द करायचा होता. त्याचे व्यासपीठ भीत्तिपत्रकाच्या रुपाने त्यांना उपलब्ध झाले त्याचा परिणाम विलक्षण झाला. विद्यार्थी त्यात लिहू लागले आणि भावनाविचार प्रवाही बनून बाहेर येऊ लागले. त्यातील काही नावे म्हणजे यशवंत मनोहर, योगीराज वाघमारे, अविनाश डोळस इत्यादी. हे पुढे साहित्यिक म्हणून मान्यता पावले. सुखराम हिवराळे तर अस्मितादर्शच्या संपादक मंडळावर होते. या विद्यार्थ्यांत मूळातच साहित्याची जाण असल्यामुळे या विद्यार्थ्यांपुढे शिक्षक म्हणून उभे राहणे हे खरोखरच आव्हान होते. हे काम त्यांनी यशस्वीपणे पार पडले. वरील नावांव्यतिरिक्त इतरही तेवढीच महत्त्वाची नावे आहेत. त्यात सुखराम हिवराळे, प्र. ई. सोनकांबळे, वामन निंबाळकर, हरीश खंडेराव, राम दोतोंडे, महेंद्र भवरे यातील आज काही अस्तित्त्वात नाहीत परंतु, साहित्यिक म्हणून ते सर्वपरिचीत आहेत. मिलिंदचा वार्षिकांक हे ही विद्यार्थ्यांना घडविण्याचे मोठे साधन ठरले. त्यात विद्यार्थी विद्यार्थीनी लिहू लागल्या. त्यातले अनुभवकथन खूप महत्त्वाचे होते. त्यावर ‘महाराष्ट्र टाईम्स’ने अग्रलेख लिहिले. दलित आत्मकथनाचे हेच उगमस्थान आहे.       प्रा. मनोहर जिलटे सरांनी एकूणच, दलित आत्मकथनाचा प्रारंभबिंदू हा मिलिंद महाविद्यालयाच्या सृजनशील मातीतूनच कसा विकसित झाली, हेच या विवेचनातून स्पष्ट केले आहे.
संवेदनशील मातृह्दयी लेखक : 
प्र. ई. सोनकांबळे यांच्या व्यक्तिमत्त्वाला घडविण्यामध्ये त्यांची मोठी बहिण आक्काची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. त्यामुळेच तर त्यांच्या एकूण लेखनात तिच्याविषयीची अपार कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली आहे. प्र. ई सोनकांबळे सरांच्या व्यक्तिगत अनुभवांना  पाहत असतांना त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकालाच ते फुले व खडी साखर देत असत त्याचबरोबर वयाने लहान मुली असो अथवा मोठया असलेल्या महिलां असोत त्यांना विनम्रतेने वंदन करत असत हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष आम्ही जवळून अनुभवलेले आहेत. प्र. ई. सोनकांबळे यांच्या एकूण लेखनात त्यांना आलेल्या भयंकर सोशिकतेची अनुभूती आलेली आहे. त्यामुळेच तर त्यांचे एकूण व्यक्तिमत्त्व व लेखन संवेदनशीलतेने भारावलेलेच आपणास दिसते.
प्र. ई. सोनकांबळे सरांच्या संबंधीचा माझा व्यक्तिगत अनुभव व्यक्त करतांना मी सांगेन की, साधारणपणे 2002-2003 मध्ये प्र. ई. सोनकांबळे सर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागात आले होते त्यावेळी मी सरांचा ऑटोग्राफ घेतला त्यावेळी मला ऑटोग्राफ देताना सरांनी पुढील शब्द लिहिले, “पुढे चला, पण कोणालाही न दुखावता’’ सोनकांबळे सरांनी लिहिलेल्या या शब्दांतच त्यांच्या मनातील इतरांविषयीची संवेदनशीलताच व्यक्त होते.
प्र. ई. सोनकांबळे सरांनी ऑटोग्राफ देतांना माझ्या वहीवर लिहिलेले ते शब्द आजही माझ्या काळजावर कोरल्यासारखे वाटतात. कारण कोणत्याही माणसाला सोशिकतेच्या भीषण अनुभवातूनच त्यांच्यातील संवेदनशीलता वृध्दिंगत होत जाते व त्यांच्या हातून निर्माण झालेल्या साहित्याची संवेदनशीलता जगाच्या पातळीवर सगळीकडेच सारखीच असते. म्हणूनच तर ‘आठवणीचे पक्षी’ या कथनाचे जगातील अनेक भाषांतर झाली.
प्र. ई. सोनकांबळे सरांच्या ‘आठवणीचे पक्षी’तून भूकेचे आलेले भीषण वर्णनच त्यांना संवेदनशील सोशिक बनवते व त्यांच्या आक्कांच्या संस्कारामुळे ते मातृह्रदयी बनतात त्यामुळेच तर त्यांच्या व्यक्तित्त्वात कमालीची संवेदनशीलता, आक्काच्या मातृह्दयाची विशालता व ‘मिलिंद’ च्या संस्कारशील, सृजनशील मातीच्या सुगंधाची अनुभूती आपणास अनुभवास येते. हे मात्र नक्की !
_______________________________________________
संदर्भ : 1. सोनकांबळे  प्र. ई., ‘आठवणीचे पक्षी’
2. आधारस्तंभ प्राचार्य ल. बा. रायमाने- संपादक अविनाश डोळस, राम        दोतोडे, लोकवाङ्मयगृह, फेब्रुवारी 2012.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'नक्षत्रांची फुले' ब्लाॅग लेखन मनोगत..

लेख क्र. 2 मिलिंद महाविद्यालयाची अमॄतमहोत्सवी वाटचाल.