लेख क्र. ४ दलितांच्या प्रवर्तनाचे प्रवाही नाट्यचित्र : युगयात्रा
दलितांच्या प्रवर्तनाचे प्रवाही नाट्यचित्र : युगयात्रा.......
डॉ.मिलिंद माणिकराव वाव्हळे,
मराठी विभाग,
मिलिंद कला महाविद्यालय, नागसेनवन,
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद.)
मो. 9421678635
मिलिंद कला महाविद्यालयाच्या अमॄत महोत्सवानिमित्त प्राचार्या डॉ.वैशाली प्रधान यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेतून मिलिंद महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य म.भि.चिटणीस यांनी लिहिलेल्या 'युगयात्रा' या नाटकाचा प्रयोग बऱ्याच वर्षांनी जवळपास 68 वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर सादर होत आहे. या नाट्य सादरीकरणाचे पहिल्या प्रयोगापासून ते आजच्या चौथ्या प्रयोगाचे ( माझ्या माहितीप्रमाणे ) एक विशेष आहे ते म्हणजे या नाटकात भूमिका साकारणारे सर्व कलावंत हे मिलिंद महाविद्यालयाचे तत्कालीन विद्यार्थी व प्राध्यापक होते तर आजही या नाटकात भूमिका साकारणारे सर्वच कलावंत (अगदी मी स्वतः या नाटकात धनसेठी व धनश्रेष्ठीची भूमिका साकारत आहे.) हे मिलिंद कला महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक आहेत.. त्यामुळेच 'युगयात्रा' हे नाटक रंगभूमीवर सादर व्हावे यासाठी सातत्याने धिरोदात्तपणे सर्व कलावंतांच्या पाठीशी असणाऱ्या आदरणीय प्राचार्या डॉ.वैशाली प्रधान यांचे मनःपूर्वक अभिनंदन व सर्वच कलावंतांना नाट्यप्रयोगाच्या सादरीकरणासाठी खूप खूप शुभेच्छा! 'युगयात्रा' या नाटकाच्या प्रयोगाच्या सादरीकरणाच्या निमित्ताने या नाटकाच्या एकूणच नाट्यसंहितेवर टाकलेला एक दृष्टिक्षेप....
मिलिंद महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य म.भि.चिटणीस यांनी 1954 मध्ये 'युगयात्रा' हे नाटक लिहिले. महात्मा फुले यांच्या पहिल्या स्वतंत्र व सामाजिक विषयावरील 'तॄतीयरत्न' (1855) या मराठी रंगभूमीवरील आद्यनाटकानंतर जवळपास सुमारे शंभर वर्षांनीच हे नाटक लिहिले आहे.. उपेक्षित दलितांचे जीवन दर्शन घडविणारे नाटक म्हणजेच 'युगयात्रा' हे नाटक.. या नाटकाचा पहिला प्रयोग मिलिंद परिसरात 14 एप्रिल 1955 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने 'संस्थापक दिना'च्या सोहळ्यात सादर करण्यात आला. 20 नोव्हे़ंबर 1955 रोजी या नाटकाचा दुसरा प्रयोग झाला. त्यावेळी बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर त्या प्रयोगाला प्रकॄती ठीक नसतानाही उपस्थित होते..हा प्रयोग त्यांना खूप आवडला आणि म्हणूनच 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे ' न भूतो न भविष्यति' अशा धर्मांतराच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार नवदीक्षित बौद्ध बांधवांच्या समोर तिसरा प्रयोग सादर करण्यात आला..दलित समाजाच्या या एका नव्या जीवनयात्रेच्या प्रसंगी रंगभूमीवर सादर होण्याचे भाग्य या नाट्यकॄतीला लाभलेले आहे असे मत या नाटकाच्या द्वितीय आवॄत्तीच्या प्रास्ताविकात आर.आर.भोळे (अध्यक्ष, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई) यांनी मांडले आहे.. या प्रयोगाच्यावेळी जवळपास सहा लाख लोक धम्मदीक्षा सोहळ्याला उपस्थित होते..एका मराठी नाटकाला एवढ्या प्रेक्षकांच्या उपस्थितीचे भाग्य लाभले हा एक सुवर्णयोगच होता असेच आपणास म्हणावे लागेल. या नाटकाच्या निमित्ताने 'खुला रंगमंच' (Open Theatre) ही संकल्पना खऱ्या अर्थाने रूढ झाली आहे..1956 नंतर मात्र या ऐतिहासिक अशा नाटकाचे पुढे सातत्याने प्रयोग होणे आवश्यक असतानाही पुढील काळात बरीच वर्षे या नाटकाचे प्रयोग सादर झाले नाहीत. ही एक खंत वाटते; त्यामुळेच तर मिलिंद कला महाविद्यालयाच्या सॄजनशील प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली या नाटकाचा प्रयोग 14 ऑक्टोबर 2024 रोजी तापडिया नाट्यमंदिर, औरंगाबाद येथे सायंकाळी 06:00 वाजता सादर होत आहे ही आनंदाची बाब आहे...
'युगयात्रा' या नाटकाच्या प्रेरणेच्या संदर्भाने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचीच प्रामुख्याने या नाट्यलेखनासाठी प्रेरणा होती हे मात्र नक्की! याविषयी प्रा.त्र्यंबक महाजन यांनी आपली आठवण सांगितली आहे. ते म्हणतात,"पुढे मी बी.ए.च्या अंतिम वर्षात असताना गॅदरिंगमध्ये हुंडा प्रतिबंधक चळवळीवर आधारित 'जुगाड' हे नाटक सादर केले तेव्हा बाबासाहेब प्राचार्य म.भि.चिटणीस सरांना म्हणाले, " आपल्या दैनंदिन प्रश्नांवर (मागासवर्गीयांची अवस्था) नाटकं नाहीत आपल्याकडे". हे ऐकून बाबासाहेब म्हणाले,"तू लिहित़ोस का?'" बाबासाहेबांसमोर नाही म्हणण्याची हिंमत नव्हती किंवा बाबासाहेबांना शब्द देणे स़ोपी गोष्ट नव्हती.. तरीही मोठ्या हिंमतीने चिटणीस म्हणाले," मी लिहितो". त्यांनी मग 'युगयात्रा' हे नाटक लिहायला सुरुवात केली.. चिटणीस सरांनी हे नाटक लिहिले व मी ते बसविले. मनुस्मृतीच्या काळापासून आंबेडकरांपर्यंतचा प्रवास त्या नाटकात होता.केवळ 'जुगाड'मुळे 'युगयात्रा'या नाटकाचा प्रवास यशस्वी झाला". अशी आपली एक आठवण प्रा.त्र्यंबक महाजन यांनी सांगितली आहे.. म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचीच प्रेरणा ह्या नाट्यलेखनामागे आहे असे आपणास म्हणता येते......
युगयात्रा' या नाटकाच्या लेखनाविषयी आपली भूमिका मांडताना प्राचार्य म.भि.चिटणीस म्हणतात," मराठी रंगभूमी आज अनेक दिशांनी वाटचाल करीत आहे..दलित रंगभूमीची संकल्पनाही स्थिर होऊ पाहत आहे. अशा परिस्थितीत 'नाट्यवस्तू' म्हणून युगयात्रेचा विचार कशा प्रकारे केला जाईल? याबद्दल मला काही म्हणावयाचे नाही. परंतु हजारो वर्षांपासून वैभवाच्या गाथा इतिहासाच्या वळणावळणावर उपलब्ध करून देणाऱ्या या देशामध्ये एक पंचमांश भारत 'दीनदलित' जनतेचा भारत जीवन जगत होता, त्यांचं जीवन ज्या पद्धतीने स्वीकारलं आणि नाकारलं जातं होतं. युगानुयुगं ज्यांच्या 'अंधारयात्रेला' प्रकाशच नव्हता अशा जीवनाची यात्रा एकत्रित स्वरूपात करणं आणि त्याची संगति लावण्याचा प्रयत्न करणं एवढाच एक लहानसा प्रयत्न म्हणून मी हे लेखन केलं.... आणि लोकांना ते आवडलं याबद्दल मला समाधान वाटतं".. या आपल्या निवेदनात प्राचार्य म.भि.चिटणीस यांनी या नाटकाचा लेखनप्रवास उलगडला आहे..या नाटकातून त्यांनी हजारो वर्षांपासून स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या कालखंडातही दलितांवर कसे अन्याय, अत्याचार होतात? याचा एक चलचित्रपटच वाचकांसमोर उलगडून दाखविला आहे..
'युगयात्रा' या नाटकाची एकूण नाट्यसंहिता पाहता, विशिष्ट विचारांचे मूळ असलेले साहित्यातून निर्माण होणारे भावसंवेदन जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी नाटकच अधिक उपयुक्त व प्रभावी ठरते. यासंबंधीची जाणीव बाबासाहेबांच्या मनात होती. ही जाणीव लक्षात घेऊन प्राचार्य चिटणीस यांनी विद्यार्थ्यांना दलितांचे जीवनदर्शन घडविणारे 'युगयात्रा' हे नाटक लिहून काढले असे मत डॉ.अशोक पळवेकर यांनी मांडले आहे..
'युगयात्रा' या नाटकाचा घाट वेगळाच होता..एक दॄश्यांची मालिका आणि त्यातून दलितांवर झालेल्या अन्यायाचे दर्शनच येथे घडविले होते. रुढार्थाने कथानक असलेले नाटक म्हणून 'युगयात्रा' हे नाटक प्रेक्षकांना अंतर्मुख करते. भारतीय समाजव्यवस्थेतील ' जाणजाणीव' लक्षात घेऊनच प्राचार्य म.भि.चिटणीस यांनी लेखन केलेले होते... डॉ.अशोक पळवेकर यांनी या नाटकाच्या फॉर्मविषयी आपले मत मांडले आहे. ते म्हणतात," भारतीय समाजव्यवस्थेतील जातजाणीव लक्षात घेऊनच प्राचार्य चिटणीसांनी या नाटकाची मांडणी केलेली होती. त्यामुळे या नाटकाचा फॉर्म किंवा आकॄतीबंधाविषयीची त्यांच्या मनात असलेली संकल्पना अगदी स्पष्ट होती. त्यांच्या काळात मराठी रंगभूमीवर सादर होणारी नाटके ही बहुप्रवेशी असत. त्यामुळे हेही नाटक बहुप्रवेशीच आहे..यात साधारणपणे दहा प्रवेश आहेत आणि नभोवक्ता हे या नाटकातील मुख्य पात्र आहे. मात्र ते कधीच रंगभूमीवर येत नाही. रंगभूमीवर पूर्ण अंधार झाल्यानंतर अत्यंत घनगंभीर आवाजात केले जाणारे हे निवेदन व भाष्य श्रोत्यांना, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करुन टाकणारे आहे. या नाटकातील नभोवक्त्याची भूमिका डॉ. म.ना.वानखडे यांनी केली. दीक्षाभूमीवरील नाट्यप्रयोगात डॉ.भालचंद्र फडके यांनी ही भूमिका निभावली होती. डॉ.फडक्यांचा आवाज अत्यंत घनगंभीर होता त्यामुळेच दीक्षाभूमीवरील लाखो मने त्यांच्या संवादाने भारावून गेली होती ". हे तत्कालीन नोंदीवरून आपणास दिसते..
'युगयात्रा' या नाटकाचा विचार करता हे नाटक बहुप्रवेशीच आहे. या नाटकात एकूण दहा दॄश्ये आहेत. या दहा दॄश्यांतून रामायण कालखंडापासून ते स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या कालखंडात अस्पृश्यांच्यावर जे अत्याचार झाले त्याचे दर्शन या दहा प्रवेशातून लेखकाने वाचकांना घडविले आहे..या नाटकातील दॄश्ये जसजशी काळाच्या पटलावरुन पुढे पुढे सरकत जातात तस तशी त्या कालखंडातील अस्पृश्यांच्या विविध दयनीय अवस्थांचे स्थित्यंतरे लेखकाने या नाटकात दाखविली आहेत.. यात पहिल्या प्रवेशात राम राज्यात शूद्रांच्या दयनीय अवस्थेची ओळख होते तर दुसऱ्या प्रवेशात तपश्चर्या करणाऱ्या शंबुकाचा वध रामाच्या हातून कसा घडतो? याचे दर्शन होते..तिसऱ्या प्रवेशात बुध्दकालीन वैचारिक तत्वज्ञानाचा प्रभाव दिसतो तर चौथ्या प्रवेशात मनूकालीन चातुर्वर्ण्यव्यवस्थेत मनुस्मृतीच्या आधारे अस्पृश्यांच्या दयनीय अवस्थेवर लेखकाने प्रकाश टाकला आहे.. पाचवा प्रवेश हा चौदाव्या - पंधराव्या शतकातील संत चोखोबा महाराच्या विठ्ठल भक्तीला अधोरेखित करतो.. सहाव्या प्रवेशात गावगाड्यातील जात व्यवस्था संत चोखोबाला कशी संपविते? याचे हृदयस्पर्शी चित्रण केले आहे.. सातव्या प्रवेशात विठू महार हा दामाजीपंताला सोडविण्यासाठी कशा प्रकारे आपल्या जीवाचे रान करतो? याविषयीचे वास्तवदर्शी चित्रण केले आहे.. तर आठव्या प्रवेशात विठू महाराच्या कार्याची तत्कालीन जातीव्यवस्थेने कशी हेटाळणी केली आहे? यावर प्रकाश टाकला आहे.. यानंतर नवव्या प्रवेशात इंग्रजी राजवटीच्या कारकीर्दींनंतरच्या कालखंडातील असूनही स्वातंत्र्यानंतरही जातव्यवस्थेची चौकट त्याकाळीही कशी बळकट होत गेली? याचेच चित्रण येते.. तर या नाटकातील शेवटचा दहावा प्रवेश हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महानायकाने महाडच्या मुक्तीसंग्रामाच्या लढ्याचं निशाण उभारल्यानंतर त्यांनी आयुष्यभर स्वातंत्र्य,समता,बंधुता व न्याय या चार मूलभूत मानवी हक्कांसाठी कसा लढा उभारला व त्याचा दूरगामी परिणाम कसा झाला? या विषयीचे चित्रण प्राचार्य म.भि.चिटणीस यांनी केले आहे..या प्रवेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महानायकाचा उदय होतो व दलितांचेच नव्हे तर एकूणच समग्र मानव जातीचे सर्वांगीण कल्याण कसे झाले? हेच या शेवटच्या प्रवेशात लेखकाने चित्रित केले आहे..हेच या नाट्यसंहितेचे थोडक्यात सारांशरुपाने कथानक आहे ..
'युगयात्रा' या नाटकाचा गौरव करताना डॉ.अशोक पळवेकर म्हणतात," ग्रीक रंगभूमीच्या इतिहासात एखाद्या नाट्यप्रयोगाला लक्षावधी प्रेक्षक उपस्थित राहत होते परंतु त्यांची उपस्थिती आणि दीक्षाभूमीवर सादर झालेल्या या नाटकाच्या प्रेक्षकांची उपस्थिती यात खूप अंतर आहे. या नाटकाच्या मूळाशी प्रबोधनाची प्रेरणा आहे. ध्येयनिष्ठ विचारांची जाणीव आहे.. याच प्रेरणेतून आणि याच जाणिवेतून या नाटकाची निर्मिती झालेली आहे.. प्राचार्य म.भि.चिटणीस यांचे सकस लेखन,न्या.भालचंद्र वराळे, यांचे दिग्दर्शन,प्रभाकर वराळे यांचे गायन, डॉ.भालच़ंद्र फडके यांचे संमोहक निवेदन आणि सुविद्य नटांचा उत्स्फूर्त सहभाग या सर्व बाबींची अत्यंत सुरेख गुंफण या नाटकात होते आणि विशेष म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाचा एक 'युगनिर्माता' या नाटकाचा नायक आहे!"या नाटकाच्यादॄष्टीने हे मत अतिशय महत्त्वपूर्ण आहे..
'युगयात्रा' या नाटकाविषयी 'दलित रंगभूमी आणि नाटक' या ग्रंथाचे लेखक डॉ.बबन भाग्यवंत यांनी आपले मत मांडले आहे. ते म्हणतात,"दलित नाट्यसॄष्टीत आणखी एका अर्थाने या नाटकाची महानता प्रत्ययाला आलेली आहे. ती म्हणजे आंबेडकरांना जसे नाटक अपेक्षित होते तसे हे नाटक आहे. म्हणूनच या नाटकाचा प्रयोग दीक्षाभूमीवर करुन किमान सहा लाख लोकांनी हे नाटक पाहिलेले आहे. एकाचवेळी एवढ्या प्रेक्षकांनी पाहिलेले जगातील हे पहिलेच नाट्य आहे "... डॉ.बबन भाग्यवंत यांनी मांडलेल्या मतावरुनच या नाटकाची महती आपणास लक्षात येते..
'युगयात्रा' या नाटकाविषयी पीपल्स एज्युकेशन सोसायटी (मुंबई) चे तत्कालीन (1982) अध्यक्ष आर.आर.भोळे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे..ही प्रतिक्रिया म्हणजेच प्राचार्य म.भि.चिटणीस यांच्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला व त्यांच्या सॄजनशील लेखणीला आभाळाएवढ्या उंचीला नेऊन पोहोचविणारी आहे.. ते म्हणतात,"युगयात्रा ही नाट्यकॄती एकाचवेळी बाबासाहेबांचं युगप्रवर्तक कार्यकर्तृत्व आणि त्यांच्यावरील निष्ठेनं झपाटलेला म.भि.चिटणीस नावाचं एक कर्तृत्व आणि संवेदनशील मन ह्यांची पावती आहे.."'.. या मताधारेच प्राचार्य म.भि.चिटणीस यांचे मोठेपण आपल्याला समजते..
'युगयात्रा' या नाटकाविषयीच्या एकूणच विशेषांवर ओझरता दॄ्ष्टिक्षेप टाकल्यास या नाटकाचे प्रयोग वारंवार होणे किती आवश्यक होते? हेच स्पष्ट होते आणि त्यामुळेच प्रदीर्घ वर्षांनंतर मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वैशाली प्रधान यांना या नाटकाचा प्रयोग रंगभूमीवर सादर करावासा वाटला.. त्यामुळेच तर दि.14 ऑक्टोबर 2024 रोजी या नाटकाचा प्रयोग त्यांच्या संकल्पनेतून, मार्गदर्शनातून व प्रा. अस्लम युनूस यांच्या दिग्दर्शनाखाली सादर होणाऱ्या 'युगयात्रा' या नाटकातील सर्व सहभागी कलावंतांचे मन:पूर्वक अभिनंदन व प्रयोगासाठी खूप शुभेच्छा....
संदर्भ ग्रंथ:
1) युगयात्रा - म.भि.चिटणीस, प्रकाशक, अध्यक्ष, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई, द्वितीयावृत्ती - 1982 ,
2) दैनिक लोकमत, दि.14 एप्रिल 2019,
3) डॉ. अशोक पळवेकर - महाराष्ट्र टाइम्स ब्लॉग, दि. 12 एप्रिल 2018,
4) दलित रंगभूमी आणि नाटक - डॉ.बबन भाग्यवंत, चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद प्रथमावृत्ती - 26 जून 2008
5) सामाजिक क्रांतीची दिशा ( प्राचार्य म.भि.चिटणीस समग्र वाङ्मय ) - संपादक- डॉ.वामन निंबाळकर, प्रबोधन प्रकाशन, नागपूर,प्रथमावॄत्ती -14 ऑक्टोबर 2007.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा